चोपडा कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने बाजार समितीची मार्केट सेस व शासनाची फी न भरणाऱ्या खासगी कापूस व्यापाऱ्यांवर ११ हजार रुपयांचा दंड ठोठावला
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चोपडा कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने बाजार समितीची मार्केट सेस व शासनाची फी न भरणाऱ्या खासगी व्यापाऱ्यांवर ११ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सदर कारवाईमुळे खेड्यापासून कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यातील मुकटी येथील कापूस व्यापारी भगवान खंडू सुर्यवंशी, समाधान पंढरीनाथ पाटील आणि आप्पा कौतिक पाटील हे चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागातील खेड्यांमध्ये कापूस खरेदी करत होते. त्यावेळी त्यांनी बाजार समितीची मार्केट सेस व शासनाची फी न भरता कापसाने भरलेला ट्रक अमळनेर शहराकडे नेत असताना बुधगाव येथील तपासणी नाक्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी ट्रक अडवला.
तपासणी नाक्यावर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांना मार्केट सेस व शासनाची फी भरण्यास सांगितले, मात्र कापूस व्यापाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरून फी भरण्यास नकार दिला. याची माहिती मिळताच बाजार समितीचे संचालक विजय शालीकराव पाटील घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर बाजार समितीचे सचिव आर. बी. सोनवणे, उपसचिव जे. एस. देशमुख आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कापूस व्यापाऱ्यांना ११ हजार रुपये दंड वसुल केला.
बाजार समितीचे सभापती नरेंद्र वसंतराव पाटील यांनी यापुढे बाजार समितीच्या तपासणी नाक्यावर अशा प्रकारच्या कारवाईंमध्ये सहभाग घेतल्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा