ऑनलाइन शोधलेल्या रुग्णालयाच्या नंबरवर संपर्क साधून बँक खात्याची माहिती घेऊन फसवणूक केली
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I रुग्णालयाच्या अपॉइंटमेंटसाठी सायबर ठगांनी फसवणूक करून जामनेर येथील तरुणाच्या खात्यातून १० लाख रुपये लंपास केले. ११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान घडलेला हा प्रकार सोशल मीडियावर ऑनलाइन शोधलेल्या रुग्णालयाच्या क्रमांकावर संपर्क साधून सुरू झाला.
विश्वेष प्रदीप बाविस्कर (३३), जामनेर येथील खासगी क्लासेसचे चालक, यांनी आपल्या वडीलांच्या उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयाचा संपर्क क्रमांक इंटरनेटवर शोधला. या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर त्यांना "डॉ. राकेश" असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने अपॉइंटमेंटसाठी एक फाईल पाठविली. त्यानंतर, त्यांना त्यांच्या बँक खात्याची, एटीएम कार्डची आणि सीव्हीव्ही क्रमांकाची माहिती विचारली. या माहितीच्या आधारे सायबर ठगांनी त्यांच्या खात्यातून १० लाख रुपये लंपास केले.
विश्वेष बाविस्कर यांनी हा प्रकार लक्षात घेतल्यावर जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरून संबंधित अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
सूचना: इंटरनेटवरील फसवणूक टाळण्यासाठी, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खात्याची आणि कार्ड संबंधित माहिती देऊ नये.
टिप्पणी पोस्ट करा