Top News

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्रीविरुद्ध मोठी कारवाई, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, भुसावळ पथकाने २३ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, सीमावर्ती भागात संयुक्त कारवाईचा यशस्वी प्रयोग

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्रीच्या विरोधात मोठा कारवाई मोहीम हाती घेतली आहे. भुसावळ विभागीय पथकाने २३ लाख ९३ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मोहिमेच्या अंतर्गत दररोज ५०० हून अधिक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे, ज्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती, अवैध मद्यविक्री करणारे ढाबे आणि सीमा तपासणी नाक्यांवरील कारवाई समाविष्ट आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने भुसावळ, मुक्ताईनगर आणि रावेर विधानसभा मतदारसंघांमध्ये तसेच संबंधित गावांमध्ये रात्रीच्या गस्तीसाठी विशेष पथक तयार करून कारवाई केली आहे. तापी आणि पूर्णा नद्या काठावर होडीने जाऊन हातभट्टी दारूच्या अड्ड्यांना धडक दिली आहे.

या कारवाईचे नेतृत्व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही. टी. भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक सुजित कपाटे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.

सीमावर्ती भागात संयुक्त कारवाई
रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यांची सीमा मध्य प्रदेशाशी लागून आहे, आणि या परिसरात दररोज ५०० वाहनांची तपासणी केली जात आहे. यासाठी मध्य प्रदेश अबकारी विभागाशी संपर्क साधून सीमा क्षेत्रात संयुक्तपणे कारवाई केली जात आहे.

गुजरात 'पासिंग'च्या कारमधून १.१९ लाखांची रोकड जप्त
जळगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी दरम्यान रामानंद नगर पोलिसांनी एका कारमध्ये १ लाख १९ हजार रुपयांची रोकड जप्त केली. ही कार (क्र. जी.जे. १५, सीएल ६०९९) शनिवारी (१६ नोव्हेंबर) संध्याकाळी आकाशवाणी चौकात नाकाबंदी दरम्यान पकडली गेली. कार चालक सौरभ सुरेंद्र चौबे (४२, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी) यांच्याकडे रकमेचा स्रोत स्पष्ट करता आले नाही. तसेच त्यांच्या कडे वैध कागदपत्रे नव्हती, म्हणून पुढील तपासासाठी फिरते भरारी पथकाला सूचित करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने