Top News

जयश्री महाजन धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दाखल करणार उमेदवारी अर्ज


जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनिल महाजन मंगळवारी, धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर, आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जयश्री महाजन यांनी सांगितले की, मंगळवार (दि. २९ ऑक्टोबर) रोजी दुपारी १२ वाजता शिवतीर्थावरून तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढली जाईल व त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल.

या रॅलीदरम्यान महाविकास आघाडीचे अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. जयश्री महाजन यांनी सांगितले की, "गेल्या दहा वर्षांमध्ये विकासाच्या आघाडीवर जळगाव शहराने अनेक आव्हाने पाहिली आहेत. आता विकासाच्या मार्गावर परत आणण्यासाठी आणि निर्माण झालेला विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी माझी उमेदवारी आहे."

या प्रसंगी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज मलिक, काँग्रेसचे शहराध्यक्ष शाम तायडे, तसेच आपचे शहर संयोजक डॉ. सुनिल गाजरे यांनी केले आहे.

सौ. जयश्री महाजन यांची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. या उमेदवारीचे स्वागत शहरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उत्साहाने केले आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने