धरणगाव, तालुका प्रतिनिधी I तिळवण तेली पंच मंडळी, सुभाष दरवाजा येथील तेली मढीच्या जागेवर अत्याधुनिक सभागृह बांधण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी २६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. यासाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली असून लवकरच या भव्य सभागृहाचे काम सुरू होणार आहे. तेली समाज पंच मंडळींनी याबाबत पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली होती.
धरणगाव नगरपरिषद हद्दीतील सिटीएस क्रमांक १४२ अ आणि १४२ ब या जागेवर तेली समाजासाठी दुमजली बहुउद्देशीय सभागृह बांधण्याचे काम प्रलंबित होते. हे सभागृह तळमजल्यावर पंच मंडळींकरिता आणि पहिल्या मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, वाचनालय व सभागृह असणार आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत प्रशासकीय मंजुरीसह २५ लाख ६० हजार ९९९ रुपयांचा निधी मंजूर झाला असून या सभागृहाचे स्वप्न साकार होणार आहे.
तेलवण पंच मंडळींनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतल्यावर त्यांनी तात्काळ निधी मंजूर केला. यामुळे समाजात उत्साहाचे वातावरण असून पंच मंडळींनी पाटील यांचे आभार मानले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा