Top News

जळगावमध्ये ‘ऑपरेशन ऑल आऊट’ची धडक कारवाई; दरोडा प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहिमेत नशिराबाद पोलिसांनी मोठी कारवाई करत दरोडा प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली आहे.

पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी आपल्या पथकासह ही कारवाई केली. गुप्त माहितीनुसार परिसरात कट्टा बाळगून दहशत निर्माण करणारा चेतन सूर्यभान पाटील (रा. वरची आळी, नशिराबाद) याच्यावर अचानक छापा टाकण्यात आला.

छाप्यात आरोपीकडून लोखंडी चंदेरी रंगाचा गावठी कट्टा (काळ्या प्लास्टिकच्या मुठीसह) तसेच एक डमी कट्टा जप्त करण्यात आला. चेतन पाटील हा दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी असून अलीकडील गोळीबाराच्या घटनेतही त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 93/2026 नुसार शस्त्र अधिनियम कलम 3/25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकातील राजेश मेंढे, कमलाकर बागुल, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, भुषण पाटील आणि विजय अहिरे यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.

या कारवाईमुळे परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने