जळगाव जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्हापेठ पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या धनंजय उर्फ धीरज दत्तू कोळी आणि अजय मारुती डोळे या दोघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे आणि आठ तलवारी जप्त केल्या. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, धीरज कोळी आणि अजय डोळे हे शस्त्रांसह फिरत असल्याची गुप्त माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांना मिळाली. त्यानंतर विशेष पथक तयार करून कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान संशयितांकडे एक गावठी कट्टा आणि एक तलवार आढळून आली. चौकशीत अजय डोळे याने हा कट्टा धीरजला विकल्याचे कबूल केले.
धीरज कोळी हा यापूर्वी पिंप्राळा येथील मारहाणीत झालेल्या मृत्यू प्रकरणात पोलिसांना हवा होता. खुनाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर नाशिक कारागृहात असताना त्याची अजय डोळे याच्याशी ओळख झाली. याच ओळखीमधून पुढे कट्टा खरेदीचा व्यवहार ठरल्याचे तपासात उघड झाले. पुढील चौकशीत अजयकडून सात तलवारी आणि धीरजकडून आणखी एक कट्टा जप्त करण्यात आला.
तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. धीरज कोळी आणि यापूर्वी आर्म्स ॲक्टखाली अटक झालेल्या गौरव साळवे यांच्यात जुना वाद होता. या वादातूनच दोघांनी एकमेकांना ठार मारण्यासाठी कट्टे खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, गौरव साळवे याला आधीच अटक झाली होती, आणि आता धीरज कोळीही पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.
टिप्पणी पोस्ट करा