Top News

Big Breaking : 500 रुपये न दिल्याच्या कारणातून तरुणाची निर्घृण हत्या; जळगाव हादरले

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील जैनाबाद परिसरात केवळ पाचशे रुपये न दिल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाचे नाव नितीन नाना काळे (वय ३५, रा. जैनाबाद, जळगाव) असे असून तो आपल्या कुटुंबासह जळगावमध्ये राहत होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो काही महिन्यांपूर्वी गोवा येथे कटलरीच्या दुकानात नोकरी करत होता. चार दिवसांच्या सुट्टीवर तो जळगावला आला होता.

रविवारी दि. २२ मार्च रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास नितीन काळे जैनाबाद परिसरातून जात असताना संशयित आरोपी शाम तुकाराम सूर्यवंशी याने त्याच्याकडे पाचशे रुपयांची मागणी केली. मात्र पैसे नसल्याने नितीनने नकार दिला. या कारणावरून आरोपी संतापला आणि त्याने धारदार शस्त्राने नितीनवर हल्ला चढवला.

या हल्ल्यात नितीन काळे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सोमवारी दि. २३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता त्याचा मृत्यू झाला.

नितीनच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा तसेच भाऊ-बहीण असा परिवार आहे.

दरम्यान या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. किरकोळ कारणावरून घडलेल्या या हत्येमुळे जळगाव शहर पुन्हा एकदा हादरले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने