Top News

सोशल मीडियातून जुळले प्रेमसंबंध, डोक्यात गोळी झाडून केली हत्या, प्रियकराची आत्महत्या

इंस्टाग्रामवर जुळलेले नाते ठरले जीवघेणे; शाळेतून आलेल्या मुलीसमोर उघडकीस आला दुहेरी मृत्यूचा थरार

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्ह्यातील चोपडा तालुका परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील अकुलखेडा येथे विवाहबाह्य संबंधातून एका विवाहित महिलेची तिच्याच प्रियकराने गोळी झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

मृत महिला अनिता जगदीश पाटील आणि देवा सुरेश धनगर हे दोघे अनिताच्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेतून घरी परतलेल्या अनिताच्या मुलीने घरात दोघांचेही मृतदेह पाहताच आरडाओरडा केला. तिच्या आवाजाने शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि पोलिसांना कळविण्यात आले.

घटनास्थळी देवा धनगर याची दुचाकी आढळून आली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून शवविच्छेदनानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

या प्रकरणी मयत महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावळे हे अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

सोशल मीडियातून जुळले प्रेमसंबंध

मृत अनिता पाटील आणि देवा धनगर यांची ओळख Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. मात्र, काही दिवसांपासून अनिता वेळ देत नसल्याचा राग देवा धनगरच्या मनात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

याच संतापातून त्याने अकुलखेडा येथे तिच्या घरी जाऊन गावठी पिस्तूलातून तिच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

या दुहेरी मृत्यूमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने