Top News

भुसावळमध्ये मध्यरात्रीच्या वादातून ४२ वर्षीय व्यक्तीची हत्या; शहरात तणाव

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळ शहरातील नेब कॉलनी परिसरात मध्यरात्री किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगर भागालगत असलेल्या नेब कॉलनीत रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास अनिल उर्फ पिंटू आत्माराम सावकारे (वय ४२) यांचा एका व्यक्तीसोबत किरकोळ वाद झाला. सुरुवातीला बाचाबाची झाल्यानंतर वाद तीव्र झाला. संतापाच्या भरात आरोपीने सावकारे यांच्या डोक्यात सिमेंटची कुंडी मारल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ सावकारे यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर नेब कॉलनी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले तसेच बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी हालचाली वेगवान केल्या असून उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, मयताच्या नातेवाईकांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने