जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे गेल्या दोन आठवड्यांपासून एका एकाकी माकडामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या हल्ल्यांमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून आतापर्यंत सुमारे ३५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गाव परिसरात माकडांचा एक समूह आला होता. मात्र काही कालावधीनंतर ती टोळी पुढे निघून गेली. त्यातील एक माकड मात्र गावातच राहिले आणि कालांतराने त्याचे वर्तन आक्रमक बनले. सुरुवातीला किरकोळ त्रास देणारे हे माकड आता थेट लोकांवर झडप घालू लागले आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना लक्ष्य करत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. हे माकड अचानक घरात घुसून स्वयंपाकघरातील वस्तू फेकाफेक करणे, अन्नधान्याची नासधूस करणे आणि घरातील सामानाची तोडफोड करणे असे प्रकार करत आहे. काही ठिकाणी छतावरून अंगणात किंवा गच्चीत बसून लोकांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
अलीकडील एका गंभीर घटनेत, एका ग्रामस्थाला माकडाने घराच्या गच्चीवरून ढकलून दिल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. संबंधित जखमी व्यक्तीवर भुसावळ येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगितले जाते. तसेच इतर ३५ जणांना चावा घेतल्याने त्यांना उपचार घ्यावे लागले आहेत. या सततच्या धोक्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालकांनी खबरदारी म्हणून मुलांना शाळेत पाठवणे बंद केले आहे. शेतकरी आणि शेतमजूरही शेतात जाण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे गावातील जनजीवन ठप्प झाले आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी वनविभागाकडे वारंवार तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र कारवाई संथ गतीने होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. संबंधित माकडाला तात्काळ पकडून सुरक्षित ठिकाणी हलवावे, तसेच जखमी नागरिकांना योग्य वैद्यकीय मदत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागात वन्यप्राण्यांच्या वाढत्या संचाराचा आणि त्यावर नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तत्काळ पावले उचलून गावकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
टिप्पणी पोस्ट करा