जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ, जिल्हा जळगाव यांच्या वतीने आयोजित महासंघ चषक २०२६ या प्रतिष्ठेच्या क्रिकेट स्पर्धेत जळगाव तालुका महासंघ संघाने ऐतिहासिक कामगिरी करत प्रथमच विजेतेपद पटकावले आहे. दमदार फलंदाजी, भेदक गोलंदाजी आणि उत्कृष्ट नेतृत्वाच्या जोरावर जळगाव संघाने संपूर्ण स्पर्धेत आपली वर्चस्व सिद्ध केली.
जळगाव तालुका संघाने साखळी सामन्यांमध्ये भुसावळ आणि जामनेर या बलाढ्य संघांना नमवत उपांत्य फेरीत दमदार प्रवेश केला. उपांत्य सामन्यात यावल संघाविरुद्ध एकतर्फी विजय मिळवत अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले.
अंतिम सामन्यात जळगाव संघाने चाळीसगाव संघाविरोधात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. अवघ्या ७ षटकांत १०४ धावांचे तगडे आव्हान उभे केले. या डावात रोहित बोरसे यांची आक्रमक आणि दमदार फलंदाजी निर्णायक ठरली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना चाळीसगाव संघ जळगावच्या भेदक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही. चाळीसगावचा डाव केवळ ८८ धावांवर आटोपला आणि जळगाव संघाने अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवत महासंघ चषकावर आपले नाव कोरले.
या संपूर्ण स्पर्धेत कर्णधार पराग सरोदे यांचे नेतृत्व अत्यंत परिणामकारक ठरले. संघाची रणनीती, खेळाडूंचा आत्मविश्वास आणि मैदानावरील शिस्त यामुळे जळगाव संघाने विजेतेपद मिळवले.
या विजयी संघात
पराग सरोदे (कर्णधार), निलेश मोरे (उपकर्णधार), मनोज भालेराव, महेश तायडे, शमशुद्दीन सिराजउद्दीन शेख, शाकीर अहमद अब्दुल हमीद, फिलिप गावित, अविनाश सरदार, चंद्रशेखर घोलप, महेंद्र साळुंखे, ईश्वरलाल येवले, निकेतन पाटील, रोहित जितेंद्र आणि आशिष पाटील
या खेळाडूंनी विशेष योगदान दिले.
संघाला ग.स. संचालक श्री. योगेश इंगळे आणि श्री. मानव भालेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महासंघाचे अध्यक्ष निलेश मोरे आणि सचिव राहुल चौधरी यांनी संघांचे उत्तम व्यवस्थापन केले.
विजयानंतर जळगाव तालुका संघाचे महासंघाचे राज्य पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी तसेच संपूर्ण तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षक बांधवांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे. या ऐतिहासिक विजयामुळे जळगाव तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे.
टिप्पणी पोस्ट करा