Top News

बंडखोरी करणाऱ्यांना जनतेकडून कधीच संधी मिळत नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I निवडणुकीत पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना जनता कधीही स्वीकारत नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उमेदवारी वाटप, घराणेशाही, बंडखोरी तसेच महायुतीच्या एकजुटीबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “निवडणुकीत पक्षाशी बंडखोरी करणाऱ्यांना जनतेचा पाठिंबा मिळत नाही, हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झाले आहे. उमेदवारी देताना आमदारांच्या परिवारातील व्यक्तींना तिकीट देऊ नये, असे आमचे धोरण सुरुवातीपासूनच निश्चित होते. मात्र काही मतदारसंघांत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि सक्षम पर्यायी उमेदवार उपलब्ध नसल्याने नाईलाजाने काही ठिकाणी तडजोडीचे निर्णय घ्यावे लागले.”

घराणेशाही टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न
निवडणुकीतील तिकीट वाटपावरून भाजपवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, भाजपने घराणेशाही टाळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. “काही मतदारसंघांत ऐनवेळी अर्ज दाखल झाले. त्या ठिकाणी पक्षाकडे तत्काळ सक्षम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे निर्णय घ्यावे लागले. मात्र याचा अर्थ पक्ष आपल्या धोरणापासून ढळला आहे, असे नाही,” असे त्यांनी सांगितले.

बंडखोरीचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की, जनतेचा कल विकास आणि स्थिरतेकडे आहे, व्यक्तीकेंद्रित राजकारणाकडे नाही.

विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजपचा आदर कायम
भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर विचारले असता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, “रवींद्र चव्हाण यांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. मात्र पक्ष म्हणून आम्हाला विलासराव देशमुख यांच्याबद्दल नितांत आदर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्याबाबत कोणतेही दुमत असण्याचे कारण नाही.”

महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास
पत्रकार परिषदेच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीतील एकजुटीचा पुनरुच्चार केला. “बंडखोर उमेदवारांना जनतेचा पाठिंबा मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. राज्यात झालेल्या विकासकामांच्या जोरावर महायुतीचे उमेदवार बहुमताने विजयी होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, राज्याच्या विकासासाठी स्थिर आणि मजबूत सरकार आवश्यक असल्याचे सांगत फडणवीस यांनी मतदारांना महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने