जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यात वाढलेल्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने प्रभावी कारवाई करत जामनेर व भुसावळ परिसरातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत पोलिसांनी तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जामनेर येथून अनुराग लक्ष्मण सूनगत (वय १९) व दर्शन बाप्पू चव्हाण (वय १८) यांना अटक करण्यात आली. पोलिसी चौकशीत त्यांनी त्यांच्या एका साथीदारासह विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. तपासाअंती जामनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमधील दोन तर भुसावळ पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील अशी एकूण तीन मोटारसायकलींचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी संबंधित पोलीस ठाण्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रवी नरवाडे तसेच त्यांच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली.
टिप्पणी पोस्ट करा