जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १३ ‘ड’ मधून एक महत्त्वपूर्ण आणि निर्णायक राजकीय घडामोड समोर आली आहे. या प्रभागातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले ग. स. सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ कार्यकर्ते मगन व्यंकट पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
हा निर्णय त्यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत जाहीर करत महायुतीप्रती आपली निष्ठा पुन्हा अधोरेखित केली. या घटनेमुळे प्रभाग १३ ‘ड’ मधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडून आला असून महायुतीची ताकद अधिक मजबूत झाली आहे.
पक्षनिष्ठेपोटी घेतलेला निर्णय
मगन पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, “मी मूळचा महायुतीचाच कार्यकर्ता आहे. पक्षनिष्ठेपोटीच मी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे महायुतीकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने भावनिक निर्णय घेत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. परंतु प्रभागातील मतांचे विभाजन टाळण्यासाठी आणि महायुतीची एकजूट अबाधित राखण्यासाठी मी स्वेच्छेने उमेदवारी मागे घेत आहे.”
ज्येष्ठ नेत्यांच्या शब्दाला दिला मान
राज्याचे मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या मार्गदर्शनाचा व शब्दाचा मान राखून आपण हा निर्णय घेतल्याचे मगन पाटील यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या नेतृत्वावर असलेला विश्वास व पक्षहिताची भूमिका यामुळेच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांना जाहीर आवाहन
यावेळी मगन व्यंकट पाटील यांनी प्रभाग क्रमांक १३ ‘ड’ मधील सुज्ञ नागरिकांना जाहीर आवाहन करत म्हटले की,
“प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे. सक्षम नेतृत्वालाच संधी द्यावी.”
महायुतीत उत्साहाचे वातावरण
मगन पाटील यांच्या या बिनशर्त पाठिंब्यामुळे प्रभाग १३ ‘ड’ मध्ये महायुतीचे पारडे अधिक जड झाले असून कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकीत याचा थेट फायदा महायुतीला होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा