Top News

तृतीयपंथीय स्मृतीदिनानिमित्त जळगावात जनजागृती कार्यक्रम संपन्न, सामाजिक बांधिलकीची नवी दिशा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I तृतीयपंथीय बांधवांवरील होणाऱ्या हिंसाचाराबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी २० नोव्हेंबर २०२५ रोजी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, जळगाव यांच्या वतीने जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. तृतीयपंथीय स्मृतीदिनानिमित्त आयोजित हा उपक्रम सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण करणारा ठरला.

कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रास्ताविक कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे यांनी करताना तृतीयपंथीय व्यक्तींविषयी समाजातील समज, संवेदना आणि समावेशकता यांची गरज अधोरेखित केली.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या प्रा. प्रफुल पाटील यांनी प्रेरणादायी भाषणातून तृतीयपंथीय व्यक्तींच्या अधिकार, सन्मान आणि त्यांच्या आव्हानांबाबत मार्गदर्शन केले. “मानवी हक्कांसाठीच्या संघर्षात समाजातील प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वाची आहे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या योगेश पाटील, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जळगाव यांनी शासनाच्या तृतीयपंथीयांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. शिक्षण, आरोग्य, निवारा आणि रोजगाराशी संबंधित योजनांचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी उत्तमरीत्या केले. आभार प्रदर्शन विशेष अधिकारी (शानिशा) अमोल कुलकर्णी यांनी केले.

या उपक्रमासाठी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तृतीयपंथीय बांधवांचा सन्मान, सुरक्षा आणि समावेशन वाढविण्यासाठी आयोजित हा उपक्रम समाजात सकारात्मकतेचा संदेश देणारा ठरला.

📸 तृतीयपंथीय प्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण बनला असून या जनजागृतीमुळे समाजात संवेदनशीलतेची भावना दृढ होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने