Top News

जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू — आरक्षण सोडत जाहीर, उमेदवारांच्या तयारीला वेग

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेत आरक्षण निश्चिती आणि सोडत कार्यक्रम पार पडला. या सोडतीनंतर आता निवडणुकीचे वातावरण तापले असून इच्छुक उमेदवारांनी प्रचारयंत्रणा व तयारीसाठी कंबर कसली आहे.

जळगाव महानगरपालिकेसाठी निवडून देण्यात येणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या ७५ इतकी आहे. यंदाच्या निवडणुकीत नवीन बहु-सदस्य प्रभाग पद्धत लागू करण्यात आली आहे. त्यानुसार, जळगाव महानगरपालिका क्षेत्रात एकूण १९ प्रभागांची रचना करण्यात आली असून, १८ प्रभागांत प्रत्येकी चार सदस्य आणि एका प्रभागात तीन सदस्य अशी निवडणूक रचना करण्यात आली आहे.
या सोडतीत विविध प्रभागांचे आरक्षण महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच सामान्य प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक इच्छुक नगरसेवक आणि नव्या उमेदवारांसाठी ही सोडत निर्णायक ठरली आहे.

महानगरपालिकेत झालेल्या या कार्यक्रमास राजकीय पक्षांचे पदाधिकारी, संभाव्य उमेदवार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवार निवडीसाठी आणि रणनिती आखण्यासाठी हालचाली वेगवान केल्या आहेत.

महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर होण्याची अपेक्षा असून, त्यानंतर जळगावमध्ये खरी राजकीय चुरस सुरू होणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने