Top News

गिरणा नदीपात्रातील वाळू चोरीविरोधात महसूल विभागाची मोठी कारवाई — आठ वाहने जप्त

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्ह्यातील गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून सक्त मोहीम राबविण्यात येत आहे. तहसीलदार शीतल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसांपासून ही मोहीम हाती घेण्यात आली असून, महसूल गस्ती पथकाने तीन डंपर आणि पाच ट्रॅक्टर अशी एकूण आठ वाहने जप्त केली आहेत.

ही कारवाई जळगाव मंडळ अधिकारी, भोकर, असोदा, पिंप्राळा, मेहरूण आणि शिरसोली येथील ग्राम महसूल अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली. गिरणा नदीपात्रात गस्त वाढवून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर नजर ठेवण्यात आली.

शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तहसीलदार शीतल राजपूत यांनी स्वतः मेहरूण तलाव परिसरात छापा टाकला. या कारवाईदरम्यान दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले असून त्यांना प्रशासकीय इमारतीच्या आवारात जमा करण्यात आले आहे.

महसूल विभागाच्या दोन दिवसांच्या मोहिमेत एकूण आठ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधित वाहनचालक आणि मालकांकडून दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

तहसीलदार राजपूत यांनी सांगितले की, “गिरणा नदीपात्रातून सुरू असलेली वाळू चोरी हा पर्यावरण आणि महसूल दोन्हींसाठी गंभीर प्रश्न आहे. अशा अवैध कारवायांवर कठोर कारवाई सुरूच राहील.”

या मोहिमेमुळे वाळू माफियांमध्ये एकप्रकारची दहशत निर्माण झाली असून, महसूल विभागाच्या गस्तीद्वारे नदीपात्रातील हालचालींवर कडक नियंत्रण ठेवले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने