जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास खोटेनगरजवळ भीषण अपघात घडला. पाळधीकडून जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. त्यापैकी एका भावाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
ही दुर्दैवी घटना निमखेडी येथील रहिवासी गणपत भिकन कुंभार (वय ३५) आणि त्यांचा लहान भाऊ अर्जुन कुंभार यांच्यासोबत घडली. दोघेही मंगळवारी रात्री दुचाकीवरून निमखेडीकडून खोटेनगरच्या दिशेने जात होते. दरम्यान, हॉटेल राधिकाजवळ पाळधीकडून येणाऱ्या एका भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि दोन्ही भावंडे रस्त्यावर फेकले गेले.
अपघात होताच घटनास्थळी आसपासचे नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी तत्काळ मदत कार्य सुरू करून दोन्ही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठा भाऊ गणपत कुंभार यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. तर, लहान भाऊ अर्जुन कुंभार यांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स वाहनांमुळे वाढणारे अपघात चिंतेचा विषय बनले आहेत. नागरिकांनी वाहतुकीसाठी अधिक दक्षता घेण्याचे आवाहन स्थानिकांनी केले आहे. दरम्यान, पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून, ट्रॅव्हल्स वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा