जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रशासनाने ‘नो पार्किंग’ चा फलक लावलेला असला तरी, प्रत्यक्षात मात्र या सूचनेचे पालन होताना दिसत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच अनेक शासकीय व खाजगी चारचाकी वाहनं उभी राहत असून, नागरिकांना येण्या-जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.
वाहन पार्किंग वर नियंत्रण ठेवण्यासाठी रक्षक नाही
पूर्वी या ठिकाणी वाहन पार्किंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक रक्षक नेमण्यात आला होता, जो दंड आकारण्याचे काम पाहत होता. मात्र सध्या त्या ठिकाणी कोणताही रक्षक कार्यरत नाही. परिणामी वाहनधारक मनमानी पद्धतीने वाहनं उभी करीत आहेत.
कार्यालयाच्या साईडला असलेली कॅन्टीन व्यवस्थादेखील गर्दीचे आणखी एक कारण ठरत आहे. चहाच्या ठिकाणी नागरिक, शासकीय कर्मचारी व भेट देणारे लोक यांच्या वाहनांची गर्दी वाढल्याने परिसरात गोंधळ निर्माण होत आहे.
चारचाकीमुळे वाहतुकीला अडथळा
तसेच, जिल्हा नियोजन भवनाच्या आवारातही असेच चित्र दिसून येते. विविध विभागांकडून येणारे अधिकारी व नागरिक नियोजन भवनाच्या वेगवेगळ्या भागात चारचाकी उभ्या करतात. यामुळे संपूर्ण परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे.
नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत, अशी नागरिकांची मागणी आहे. मात्र सध्या शासकीय वाहनांवर कारवाई होत नाही, तर खाजगी वाहनधारकांवरच दंड आकारला जातो, अशी नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, जिल्ह्यातील सर्वोच्च प्रशासनिक कार्यालयातच जर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जात असतील, तर इतरत्र कायदा-सुव्यवस्थेची अपेक्षा कशी ठेवायची?
नियम सर्वांसाठी समान
आजच जिल्हा नियोजन भवनात डीपीडीसी (District Planning and Development Council) ची बैठक पार पडली. या बैठकीसाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मात्र बैठकीच्या दिवशीसुद्धा या अधिकाऱ्यांच्या चारचाकी गाड्या ‘नो पार्किंग’ झोनमध्ये उभ्या असल्याचे दृश्य दिसून आले. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या ‘नियम सर्वांसाठी समान’ या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, किंवा कमीत कमी नो पार्किंग झोनमध्ये नियम सर्वांसाठी सारखेच लागू करावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
टिप्पणी पोस्ट करा