आमदार किशोर पाटील यांची घटनास्थळी पाहणी, गर्दी कमी असल्याने मोठा अनर्थ टळला
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (पारोळा चौफुली) येथील न्यू मिलन टी हॉटेलमध्ये रविवारी दुपारी सुमारे १.३० वाजता डी-फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाला. या घटनेत हॉटेल चालकाचा मुलगा सोहिल मणियार यासह नऊ ते दहा नागरिक गंभीर जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुपारची वेळ असल्याने हॉटेलमध्ये गर्दी कमी होती, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अपघातानंतर तात्काळ जखमींना भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी पाचोरा, जळगाव व धुळे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सोहिल मणियारला धुळे येथे हलविण्यात आले असून काही जखमींवर पाचोरा येथील विघ्नहर्ता, सिद्धिविनायक व समर्पण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर बापूजी फाउंडेशनच्या रुग्णवाहिकांद्वारे काही जखमींना जळगाव आणि धुळे येथे दाखल करण्यात आले.
जखमींमध्ये सोहिल मणियार (भडगाव), राजकुमार पवार (कर्नाटक), नितीन पाटील (सातारा), गजानन शेळके (जालना), रवींद्र सोनवणे (माजी जळगाव बस सोसायटी उपाध्यक्ष, भडगाव), दिलीप पाटील (निवृत्त जेडीसीसी बँक शिपाई, भडगाव), भूषण पाटील (जुवार्डी), मयूर राजपूत (वडधे), मोसिम डांसर (भडगाव), मिर्झा आणि इतर काही नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये कर्नाटकातील एका प्रवाशाचाही समावेश असल्याचे विशेष नमूद करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली आणि आवश्यक ती मदत केली. अपघातानंतर हॉटेल परिसरात व रुग्णालयांत नातेवाईक व मित्रांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या प्रसंगी बापूजी फाउंडेशनचे रुग्णवाहिका चालक भैय्या पाटील, मनोज पाटील, गोलू शिंदे, सागर पाटील यांनी महत्त्वपूर्ण मदत केली.
घटनेनंतर भडगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक लक्ष्मी करंकाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण पाटील व अन्य पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
टिप्पणी पोस्ट करा