जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुक्यात घडलेल्या भीषण अपघातात जळगाव (महाराष्ट्र) येथील सौ. लक्ष्मी विराणी यांचे अकाली निधन झाले आहे. या अपघातामुळे जळगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामपूर तालुक्यातील हिंदुस्तान-तिबेट राष्ट्रीय महामार्ग (नं. 05) वरील बिथल (कालीमिट्टी) परिसरात काल संध्याकाळी मुसळधार पावसामुळे डोंगरावरून मोठे दगड कोसळले. हे दगड थेट एका खासगी बसवर आदळल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये सौ. लक्ष्मी विराणी (जळगाव) यांचा समावेश आहे. तसेच १५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तसेच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तत्काळ महात्मा गांधी वैद्यकीय सेवा केंद्र, खानरी (रामपूर उपजिल्हा) येथे दाखल करण्यात आले. विराणी यांचा मृतदेह सध्या रामपूर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून वैद्यकीय नियमांनुसार उद्या सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या सहकारी श्री. तरुण रामचंदानी (वय २६) यांच्या ताब्यात देण्यात येईल आणि पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात येईल.
या अपघाताची माहिती मिळताच जळगाव जिल्हा प्रशासनाने शिमला जिल्हा प्रशासन तसेच हिमाचल प्रदेश शासनाशी तातडीने संपर्क साधून समन्वय साधला. शिमला जिल्हा प्रशासनाने त्वरित सहकार्य करत आवश्यक ती सर्व व्यवस्था केली.
लक्ष्मी विराणी यांच्या निधनाने जळगावात शोककळा पसरली आहे. त्यांचे कार्यक्षेत्र, सहकारी व मित्रपरिवार यांच्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व दुःखाच्या या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना धैर्य मिळो, अशी प्रार्थना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा