जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सलग सातव्यांदा विजय मिळवला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार दिलीप खोडपे यांना तब्बल एक लाखांहून अधिक मते मिळूनही ते पराभूत झाले. हा पराभव नेमका कशामुळे झाला, याबाबतचा गौप्यस्फोट राज्यसभेचे माजी खासदार ईश्वर जैन यांनी गुरुवारी जळगावातील पक्ष मेळाव्यात केला.
“कामगार कमी पडले, आम्ही झोपेत होतो”
जैन म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत आमचे पदाधिकारी व कार्यकर्ते ऐनवेळी कमी पडले. जामनेरमध्ये दिलीप खोडपे यांचा पराभव अवघ्या २६ हजार ८८५ मतांनी झाला. पण तुतारीशी साधर्म्य असलेल्या पिपाणी चिन्हावर लढणाऱ्या उमेदवाराने जवळपास १८ हजार मते घेतली. त्यामुळे आमच्या मतांमध्ये मोठी गळती झाली. शिवाय बाहेरगावाहून गाड्या भरून आणलेले मतदार कोण होते, कुठून आले याची माहितीच आम्हाला नव्हती. आम्ही झोपेत होतो आणि शेवटी हार पत्करली,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
साताऱ्याचा धक्का, जामनेरमधून धडा
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने दहा पैकी आठ जागा जिंकून दमदार कामगिरी केली होती. मात्र, साताऱ्यातील शशिकांत शिंदे यांचा उदयनराजे भोसले यांनी केलेला पराभव पक्षासाठी वेदनादायी ठरला. त्या वेळीही पिपाणी-तुतारीच्या गोंधळामुळे मतदार गोंधळले, असा आरोप झाला होता. हाच धक्का जामनेरमध्येही बसल्याचे जैन यांनी अधोरेखित केले.
संघटन मजबुतीची गरज
मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जैन म्हणाले, “या पराभवातून आपल्याला मोठा धडा घ्यायला हवा. निवडणुकीच्या वेळी फक्त नेत्यांवर विसंबून चालणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने उभे राहिले पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शरद पवार गटाने संघटन मजबूत करून कामाला लागले पाहिजे.”
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या मेळाव्यास शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, पक्ष निरीक्षक भास्करराव काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा