अंत्यसंस्कारादरम्यान आरोपींच्या घरांवर हल्ला, दुचाकींची व कारची तोडफोड-जाळपोळ
आठ आरोपींना अटक, दोन फरार; बिलवाडीत तणावपूर्ण शांतता, गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, जिल्हाधिकारी व एसपींची गावात भेट
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I तालुक्यातील बिलवाडी गावात रविवारी (दि. १४ सप्टेंबर) दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. या मारामारीत एकनाथ गोपाळ (वय ५५) यांचा मृत्यू झाला असून तब्बल ११ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुटुंबीयांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
हाणामारीत मृत्यू पावलेले एकनाथ गोपाळ यांचा मृतदेह आरोपींना अटक न झाल्याशिवाय ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. सोमवारी सकाळी गोपाळ कुटुंबीय व ग्रामस्थांनी महामार्गावरील आकाशवाणी चौकात चक्का जाम करून रास्ता रोको केला. त्यानंतर त्यांनी मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व निवेदन दिले. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनाही निवेदन सादर करण्यात आले.
अंत्यसंस्कारादरम्यान तोडफोड व जाळपोळ
शव ताब्यात घेऊन अंत्यविधी सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला संशयित आरोपींच्या नातेवाईकांच्या घरांवर हल्ले झाले. काही घरांमध्ये तोडफोड करून फ्रिज, दुचाकी, धान्य यांची नासधूस करण्यात आली. एका चारचाकी वाहनाची तोडफोड झाली असून एका घरावर जाळपोळीचा प्रयत्नही करण्यात आला.
प्रशासन व पोलिसांचा ताफा गावात दाखल
घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे guardian मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह मोठा ताफा गावात दाखल झाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांची कारवाई
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ संशयित आरोपींना अटक केली आहे. दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून पूर्ण दक्षता घेतली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा