जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून नावाजलेली खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (KCE) यंदा आपल्या शैक्षणिक कार्याचा ८१ वा वर्षपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.४५ वाजता संस्थेच्या प्रांगणात हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, केसीईच्या सर्व संस्था प्रथमच एका दिवशी एकत्रितपणे आपली गौरवशाली वाटचाल, कार्य आणि यशोगाथा विविध अंगांनी मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर एकूण १७ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१९४४ पासून ज्ञानदीप प्रज्वलित
१९४४ साली स्थापन झालेल्या या संस्थेने सुरुवातीला विद्या प्रसारक मंडळाच्या इमारतीत कार्य सुरू केले. त्यानंतर दानशूर मूळजी जेठा यांनी दिलेल्या जागेत संस्थेचा पाया घालण्यात आला. “ज्ञान प्रसारो व्रतम” या ब्रीदवाक्याने सर्वसामान्यांसाठी शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने ही संस्था उभी राहिली.
आज केसीई सोसायटी २७ एकरांवर विस्तारलेली असून, २० हजारांहून अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. मागील ८० वर्षांपासून अविरत शैक्षणिक सेवा देत असलेली ही संस्था आता संशोधन, प्रगल्भ शैक्षणिक चळवळ आणि सामाजिक बांधिलकीसाठी ओळखली जाते. “Knowledge is Power” या ठाम विश्वासाने केसीईने सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दीप प्रज्वलित ठेवला आहे.
विविध क्षेत्रातील प्रगतीशील प्रवास
केसीईच्या अंतर्गत १९४५ मध्ये स्थापन झालेले मूळजी जेठा महाविद्यालय, १९७० मधील एस.एस. मन्यार लॉ कॉलेज, १९८६ मधील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, २००१ चे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, २०१० चे पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, तसेच ओरिऑन इंग्लिश मीडियम स्कूल, एकलव्य क्रीडा संकुल, डॉक्टर अब्दुल कलाम स्किल डेव्हलपमेंट सेंटर आदी अनेक संस्था यशस्वीपणे कार्यरत आहेत.
नामवंत मान्यवरांचे मार्गदर्शन
संस्थेला आजवर माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. विजय भटकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर, आचार्य रजनीश, पद्मश्री पी.टी. उषा यांसारख्या अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन आणि शुभेच्छा लाभल्या आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या स्वतः मूळजी जेठा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी होत्या.
१६ सप्टेंबरचा कार्यक्रम
या भव्य सोहळ्यात क.ब.चौ.उ.म.वि.चे मा.कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर मा.उप कुलगुरू एस.टी. इंगळे हे विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष अँड. श्री. प्रकाश पाटील भूषवणार आहेत.
कार्यक्रमात संस्थेच्या कार्याची झलक दाखवणारी चित्रफीत प्रदर्शित होणार असून, त्यातून केसीईचा ऐतिहासिक प्रवास आणि आजवरची कामगिरी उलगडली जाणार आहे.
भविष्याचा संकल्प
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० नुसार केसीई सोसायटी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कला, विज्ञान, वाणिज्य, भारतीय ज्ञान प्रणाली, संगीत, योगशास्त्र, निसर्गोपचार अशा विविध शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट स्तरावर अभ्यासक्रम सुरू करत आहे. पुढील काळात संस्था संशोधन आणि माहिती तंत्रज्ञानावर भर देऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास येण्याचा संकल्प करत आहे.
👉 गेल्या आठ दशकांहून अधिक काळ सातत्याने शैक्षणिक कार्य करणारी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचा ८१ वा वर्धापन दिन उत्सव हा जळगावकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा