Top News

मोठी बातमी I जळगावात अवैध होर्डिंगवरून वादंग : नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर मनपा प्रशासन गप्प?

पावसाळ्यात भलेमोठे होर्डिंग, नागरिकांच्या जीवाशी खेळ?

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेआड एवढे मोठे होर्डिंग कसे?

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील आकाशवाणी चौकात गेल्या तीन दिवसांपासून एक भलेमोठे होर्डिंग उभारण्याचे काम सुरु असून, यामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. शहरात गेल्या दोन दिवसांपासून वारा, वादळ आणि पावसाचा जोर वाढलेला असताना इतक्या मोठ्या होर्डिंगकडे मनपा प्रशासनाने कानाडोळा केला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आकाशवाणी चौक परिसरात लहानमोठ्या अपघाताच्या घटना वारंवार घडत असतात. त्यातच पावसाळ्याच्या दिवसांत वाऱ्याचा जोर वाढल्यास हे होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. मग प्रश्न असा की, इतक्या मोठ्या होर्डिंगसाठी मनपा प्रशासनाने परवानगी दिली आहे का? जर परवानगी दिली असेल तर नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?

सुट्टीमुळे अडकली कारवाई?
या संदर्भात १६ ऑगस्ट रोजी मनपाच्या एका अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की या होर्डिंगसाठी नोटीस तयार आहे; परंतु दोन दिवस सुट्टी असल्याने ती नोटीस सोमवारीच स्वाक्षरी करून देण्यात येईल. यावरून प्रश्न असा निर्माण होतो की, तोपर्यंत होर्डिंगचे काम पूर्ण होऊन ते उभारण्यात आले तर मग नोटीस दिली जाणार तरी कुणाला?

बड्या अधिकाऱ्यांच्या नजरेआड?
आकाशवाणी चौक हा जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय व मनपा कार्यालयाकडे जाणारा मुख्य मार्ग आहे. या मार्गावरून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिवसातून दोन ते तीन वेळा वर्दळ असते. तरीही एवढ्या मोठ्या होर्डिंगकडे कोणाच्याच नजरा का गेल्या नाहीत? यावरून मनपा प्रशासनावर कुठला दबाव आहे का, असा संशयही नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने