जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील टिळक नगर परिसरात मंगळवारी (२६ ऑगस्ट) सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. पायी चाललेल्या एका वृद्ध महिलेला लक्ष्य करत अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांनी तिच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. ही घटना सायंकाळी सुमारे ७ वाजता घडली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शारदा अर्जुनराव जाधव (वय ७६, रा. मयूरेश्वर कॉलनी, जळगाव) या वृद्ध महिला आपल्या मैत्रिणीसोबत टिळक नगरातील मंदिरातून दर्शन घेऊन घरी परत जात होत्या. त्याच वेळी, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले व काही क्षणांतच दुचाकीवरून भरधाव वेगाने पळ काढला.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे शारदा जाधव घाबरून गेल्या आणि त्यांनी मोठ्याने आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत चोरटे घटनास्थळावरून फरार झाले होते. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनीही धाव घेतली, मात्र चोरट्यांचा कुठलाही थांगपत्ता लागला नाही.
शारदा जाधव यांनी बुधवारी तालुका पोलीस ठाण्यात या चोरीसंदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमुळे टिळक नगर व परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच अशा घटनांबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा