Top News

वडिलांचा विचारांचा वारसा पुढे नेत चित्रांगा चौधरी यांना विधी विषयात पीएच.डी.

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I वडिलांचा विचारांचा वारसा, आईचे आचरण आणि स्वतःची जिद्द यांचा संगम साधत जळगाव येथील चित्रांगा अनिल चौधरी यांनी विधी विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. “Empowerment of Women with Reference to Sexual Harassment at Workplace – An Analytical Study” या विषयावर त्यांनी आपला संशोधनप्रबंध सादर केला आहे.

जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विधी व माहितीचा अधिकार विभागात स्वीय सहायक म्हणून कार्यरत असलेल्या चौधरी यांनी केवळ संशोधनच नव्हे तर सामाजिक भानही जपले आहे. वयाच्या पंधराव्या वर्षापासून मोफत क्लासेस घेणे, नोकरीसह समाजकार्यात सक्रिय राहणे, या सर्वांतून त्यांचा ४० वर्षांचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

 चौधरी यांनी एस.एस. मणियार विधी महाविद्यालय, जळगाव येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. विजेता सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आपला शोधप्रबंध पूर्ण केला. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, तसेच डॉ. नितीश चौधरी (नंदुरबार), डॉ. साजीदा शेख (धुळे), डॉ. विजय बहिराम (धुळे) यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

घर-गृहस्थी सांभाळून शिक्षणाच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या चौधरी यांनी एक मुलगी, सासू, आजी, नोकरी अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आपले ध्येय गाठले. त्यांची कन्या साक्षी अनिल चौधरी आणि मुलगा प्रीतेश चौधरी हे देखील पीएच.डी. शिक्षण घेत आहेत.

कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाच्या घटना समुपदेशनातून अनुभवलेल्या चौधरी यांचा प्रयत्न आता या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समाजोपयोगी ठरेल. “आपल्या शिक्षणाचा उपयोग लोकांचे प्रश्न व समस्या समजून घेण्यासाठी व्हावा” हा त्यांचा उद्देश असून, त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने