जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील एमआयडीसी परिसरातील स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजमधील तांब्याच्या पट्ट्यांची चोरी अखेर उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा पर्दाफाश करत तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१५ ऑगस्ट रोजी रात्री कंपनीतून तांब्याच्या पट्ट्यांची चोरी झाल्यानंतर व्यवस्थापक बाळू गोवर्धन पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात अज्ञातांविरुद्ध फिर्याद नोंदवली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे चौकशी केली असता, कंपनीत काम करणारेच तीन तरुण चोरीत सामील असल्याचे समोर आले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये ओम रामेश्वर पोपटकर (२०), रोहित उर्फ रोहन भिकन मराठे (२२) आणि सागर धर्मेंद्र सपकाळे (१९) यांचा समावेश आहे. संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांकडे सोपविण्यात आले असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या आरोपींनी यापूर्वीही अशा स्वरूपाचे गुन्हे केले असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्याबाबतचा तपास पोलीस हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह अतुल वंजारी, विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, प्रविण भालेराव, किशोर पाटील, राहुल रगडे, उदय कापडणे, मुरलीधर धनगर व सिद्धेश्वर डापकर यांनी संयुक्तपणे ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
टिप्पणी पोस्ट करा