जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या "मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण योजना" राबविण्यात येत असताना, जळगाव शहरातील आयएमआर कॉलेजमधील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाच्या धोरणांचा अवमान करत, कॉलेज प्रशासनाकडून योजनेसंदर्भात उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.
या विरोधात आज बुध्दजीवी भाजप संघटनेचे अध्यक्ष प्रवीण जाधव यांच्या नेतृत्वाखाली संबंधित विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासन धोरणांची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालय प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
"शासनाने शिक्षण मोफत जाहीर केले असताना कॉलेज प्रशासन शुल्क मागत आहे. योजनेची माहिती विचारली असता अस्पष्ट आणि दिशाभूल करणारी उत्तरे दिली जात आहेत. यामुळे गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षणात अडथळा निर्माण होत आहे," असे आंदोलक विद्यार्थिनींनी सांगितले.
प्रवीण जाधव यांनी सांगितले की, "राज्यातील लाखो विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ होत आहे. मात्र आयएमआर कॉलेजमध्ये योजनेचा गैरवापर होत असून, विद्यार्थिनींना अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. प्रशासनाने तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल."
यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून आयएमआर महाविद्यालयाच्या कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली असून लवकरच चौकशी केली जाईल, असे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा