जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राज्यात महिलांवरील अत्याचार आणि हुंड्यासाठी होणाऱ्या छळाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच जळगावातून समोर आलेल्या एका प्रकरणाने खळबळ उडवली आहे. पीडित महिलेने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यावर धमकी देण्याचा थेट आरोप केला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पीडित महिला सीमा नाफाडे हिच्या तक्रारीनुसार, तिचा पती पांडुरंग नाफडे — जो रोहिणी खडसे यांचा माजी पीए असल्याचे सांगितले जाते — एका आर्थिक घोटाळ्यात फरार आहे. सीमा हिचा आरोप आहे की, सासरच्या मंडळींसह पतीकडून दीड वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक छळ होत आहे. पैशांसाठी तिच्यावर सतत दबाव टाकण्यात येत असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.
धमकी दिल्याचा आरोप, पोलिसांत तक्रारीला अडथळे
तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यास "आम्ही बघून घेऊ" अशा शब्दांत रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याचा आरोपही सीमाने केला आहे. त्यामुळे ती आतापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू शकली नव्हती. मात्र आता जीवाला धोका असल्याने राज्य महिला आयोगाकडे थेट धाव घेतली आहे. "माझ्या आणि मुलीच्या जिवाला काही झाल्यास खडसे कुटुंबीय, नाफडे कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जबाबदार धरावे," असेही तिने निवेदनात नमूद केले आहे.
महिला आयोगाचा हस्तक्षेप; गुन्हा दाखल करण्याचे आदेश
या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. पीडितेला आणि तिच्या मुलीला न्याय मिळावा, यासाठी आयोग कटिबद्ध आहे, असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा