जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या (र.नं. ५४९) जळगाव जिल्हा कार्यकारिणीची निवड नुकतीच उत्साहात पार पडली. या निवडीत दिलीप लक्ष्मण गवळी यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांना ही जबाबदारी पुन्हा तिसऱ्यांदा मिळाल्याने समाजात सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
जालना येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री तसेच गवळी समाजाचे राष्ट्रीय समन्वयक हंसराज अहिर यांच्या हस्ते दिलीप गवळी यांना जिल्हाध्यक्षपदाचे निवड प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी प्रदेशाध्यक्ष हिरामण आप्पा गवळी, प्रदेश कार्याध्यक्ष वसंतनाना नामगवळी (मनमाड), युवा प्रदेशाध्यक्ष प्रविण हुंडीवाले, वरिष्ठ मार्गदर्शक प्रा. भालचंद्र हुच्चे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिलीप गवळी यांनी नोकरी सांभाळून विविध सामाजिक, क्रीडा आणि सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना भारत सरकारकडून राष्ट्रपती पदक, तसेच महाराष्ट्र शासनाकडून गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आणि गुणवंत जिल्हा क्रीडा संघटक पुरस्कार मिळाले आहेत.
गवळी यांनी मागील ३०–३५ वर्षांपासून समाज संघटनेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण सामाजिक कार्य केले असून, त्यांना "समाज भूषण पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले आहे. रायफल शूटिंग या क्रीडाप्रकारात त्यांनी राष्ट्रीय स्तरावर २२ पदके पटकावली असून, रायफल असोसिएशनच्या माध्यमातून २ आंतरराष्ट्रीय आणि ६०० हून अधिक राष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत.
शालेय जीवनात N.C.C. मध्ये सक्रिय सहभाग घेत असताना त्यांनी हिमाचल प्रदेशातील कुलू-मनाली येथे रॉक क्लायम्बिंगचे प्रशिक्षण घेतले. तसेच २६ जानेवारी १९७८ रोजी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन परेडमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. १९८१ मध्ये आग्रा येथे पॅराशूट ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करत, पॅकट लष्करी विमानातून उड्या मारून "इंडियन पॅराट्रूपर" हा मान मिळवला आहे.
दिलीप गवळी यांच्या या कार्याची दखल घेत जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा त्यांच्या निवडीचे स्वागत गवळी समाजाच्या विविध स्तरातून होत आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा