रात्रीच्या सुमारास ट्रॅव्हल्स व ट्रकची समोरासमोर धडक; परिसरात शोककळा
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्ह्यात अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच मंगळवारी रात्रीच्या सुमारास जळगाव-अकोला राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. ट्रॅव्हल्स बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना इतकी भीषण होती की, बसचा पुढचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगाव येथून अकोल्याच्या दिशेने निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बस एका ट्रकला जोरदार धडकली. अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. रात्री उशिरा झालेल्या या अपघातामुळे अंधार आणि वाहतुकीची अडचण यामुळे बचावकार्यात अडथळे आले. मात्र, स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत मदतीस धाव घेतली आणि जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. जखमींवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांपैकी एका प्रवाशाची ओळख पटली असून, दुसऱ्याच्या ओळखीचे प्रयत्न सुरू आहेत.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघाताच्या कारणाचा तपास पोलीस करत आहेत. नागरिकांनी प्रवासादरम्यान सुरक्षितता पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा