आयुक्तांच्या दालनात शिंदे गटाचा जाब; तणावपूर्ण वातावरण, प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील समता नगर परिसरात असलेल्या नागेश्वर कॉलनीत मोकाट कुत्र्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, नुकत्याच घडलेल्या हृदयद्रावक घटनेत एका चार वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बालक घरासमोर खेळत असताना अचानक काही मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालकाचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी नागरिकांनी तात्काळ मनपाच्या हलगर्जी कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढत असल्याची तक्रार नागरिक करत असतानाही मनपाने कोणतीही ठोस पावले न उचलल्याचे आरोप करण्यात येत आहेत.
या घटनेची दखल घेत सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) देखील आक्रमक झाला आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट मनपा आयुक्तांच्या दालनात दाखल झाले. त्यांनी प्रशासनाला जबाबदार धरत तीव्र शब्दांत जाब विचारला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा रोष पाहता आयुक्तांच्या दालनात काही वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात असून, मनपा प्रशासन केवळ निव्वळ आश्वासने देण्यात मग्न आहे. अशा घटनांना जबाबदार कोण?" यासोबतच त्यांनी मोकाट कुत्र्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
या प्रकरणानंतर मनपा प्रशासनाकडून काय पावले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, एका निष्पाप बालकाच्या मृत्यूनंतर जळगावकरांचा संयम सुटलेला दिसतो आणि सत्ताधारी शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा देखील याचाच परिणाम मानला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा