लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करत तिघा आरोपींना अटक केली. यामध्ये एका सराईत गुन्हेगारासह एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून लाखो रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
पहिला गुन्हा: राजस्थानला गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी
सावीत्रीनगर येथील सुरेश हिराराम सोलंकी यांच्या घरी घरफोडीचा प्रकार घडला. सोलंकी कुटुंब लग्नसमारंभासाठी राजस्थानला गेल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील १ लाख ६० हजार रुपयांच्या चांदीच्या वस्तू आणि ४० हजार रुपये रोख असा एकूण २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला.
तक्रार दाखल होताच एमआयडीसी पोलिसांनी तपासाला गती दिली. गुन्हे शोध पथकाने ५१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, सराईत गुन्हेगार विशाल मुरलीधर दाभाडे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याचे या चोरीत सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्या हालचालींवर नजर ठेवली असता तो श्री ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथे लपल्याचे आढळले. तातडीने पथक पाठवून पोलिसांनी त्याला एका लॉजमधून ताब्यात घेतले.
चौकशीत विशालने साथीदार दिपक राजू पाटील (रा. तांबापुर, जळगाव) सोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी मुक्ताईनगर येथे जाऊन दिपक पाटीललाही अटक केली. त्यांच्याकडून १ लाख १५ हजार रुपयांच्या चांदीच्या वस्तू, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.
दुसरा गुन्हा: अल्पवयीन आरोपीकडून घरफोडी
दुसऱ्या प्रकरणात, गणेशपुरी मेहरुण, जळगाव येथील मोहसीन खान अजमल खान यांच्या घरात चोरी झाली. चोरट्याने त्यांच्या घरातून २३ हजार ३०० रुपये चोरून नेले. तपास सुरू असताना पोलिसांना मास्टर कॉलनीतील एका विधीसंघर्ष बालकावर संशय होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली.
पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शन, गुन्हे शोध पथकाचे कौतुक
या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी मार्गदर्शन केले. गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी तपास करून अवघ्या २४ तासांत आरोपींना गजाआड केले.
या कारवाईमुळे एमआयडीसी पोलिसांचे कामगिरीचे कौतुक होत असून, जळगाव शहरातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा