Top News

जळगावात भरधाव कंटेनरची जोरदार धडक, दुचाकीस्वार जागीच ठार


शहरातील महामार्गावर शिवकॉलनीजवळ घडली घटना

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
बुधवार दि. ५ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जळगाव शहरात महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात विजय नामदेव भोई (४५, रा. आशाबाबा नगर) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शिवकॉलनी येथील पान टपरी चालक विजय भोई रात्री घरी जात असताना, पाळधीकडून भुसावळकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कंटेनर दुचाकीला काही अंतरापर्यंत ओढत नेले. त्यात विजय भोई जागीच ठार झाले.

अपघाताच्या बातमीने स्थानिक नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला. अपघातानंतर नागरिक महामार्गावर उतरले आणि रास्ता रोको केला. त्यांचे म्हणणे होते की, महामार्गावर वारंवार होणारे अपघात लक्षात घेत प्रशासनाने कडक उपाययोजना कराव्यात. या घटनेमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या आणि वाहतूक ठप्प झाली होती.

दुसरीकडे, जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढली आणि त्यांना शांत केले. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. अपघातातील मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.

महामार्गावर होणारे अपघात, तसेच त्यावर प्रशासनाची योग्य कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये निराशा दिसून येत आहे. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने