Top News

मुक्ताईनगरमधील पाटील कुटुंबाचा एरंडोल जवळ भीषण अपघात; पत्नीचा मृत्यू, तीन मुले गंभीर जखमी


शिर्डीवरून परत येत असताना कंटेनरने मारुती स्विफ्ट कारला धडक, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील घटना

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
मुक्ताईनगरमधील पाटील कुटुंब शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेऊन परत येत असताना एरंडोल जवळ झालेल्या भीषण अपघातात पत्नीचा मृत्यू झाला आहे. अपघातात पतीसह त्यांची तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना एरंडोल ते धरणगाव दरम्यान पिंपळकोठा गावाजवळच्या राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. अपघाताची नोंद एरंडोल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, आणि रात्री उशिरा तपास सुरू आहे.

मुक्ताईनगर येथील शिक्षक राजेश वासुदेव पाटील (वय ४६) आणि त्यांच्या पत्नी रुपाली पाटील (वय ४०) व तीन मुलं – खुशी, स्वरा आणि गुरु, हे शिर्डीला देवदर्शनासाठी गेले होते. सोमवारी २४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२.३० वाजता ते मुक्ताईनगरकडे परतत असताना, एरंडोल ते जळगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर यूपी ढाब्यासमोर अचानक आलेल्या कंटेनरने (डब्लू बी २३ एफ ९४७२) त्यांच्या मारुती स्विफ्ट कारला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळली, ज्यामुळे अपघात अत्यंत भीषण झाला.

अपघातानंतर रस्त्यावरून येणाऱ्या प्रवाशांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतलं. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी रुपाली पाटील यांना मृत घोषित केलं. त्यांच्या तीन मुलांना तातडीने एरंडोल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  

राजेश पाटील यांनी सांगितले की, कंटेनर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अचानक वाहन रस्त्यावर आणल्यामुळे हा अपघात झाला. घटनेनंतर राजेश पाटील यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, कंटेनर चालकाविरोधात योग्य कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने