जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, पुण्यातील घटना ताजी असतानाच नालासोपारा येथे एका नराधम बापाने आपल्याच तीन अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या नराधम बापाने आपल्या मोठ्या मुलीवर गेल्या अनेक वर्षांपासून अत्याचार केले, ज्यामुळे तिला चार वेळा गर्भपाताला सामोरे जावे लागले. तसेच, तिच्या दोन अल्पवयीन बहिणींवरही त्याने अत्याचार केले.
पीडित मुली मूळ कोकणातील असून, त्या आपल्या आई-वडिलांसह तेथे राहत होत्या. मात्र, वडील सातत्याने त्यांच्यावर अत्याचार करत होते. अखेर अत्याचाराला कंटाळून आईने पाचही मुलींना घेऊन नालासोपारा येथे नातेवाईकांकडे आसरा घेतला.
यानंतर 21 वर्षीय मोठ्या मुलीने हिंमत करून नालासोपारा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार, तिच्या दोन अल्पवयीन बहिणींवरही अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
आरोपीवर यापूर्वीही खंडणी, गोळीबार आणि हत्येसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो एक सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पीडित मुलींनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे वडील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने त्यांना त्यांची भीती वाटत होती. मात्र, वारंवार होणाऱ्या अत्याचारांमुळे त्यांनी अखेर पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा