Top News

जळगावमधील उर्दू शाळेत शिक्षिकेचा विनयभंग, मुख्याध्यापकासह चेअरमनवर गुन्हा दाखल


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील एका उर्दू शाळेतील ४२ वर्षीय महिला शिक्षिकेला अश्लील शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि चेअरमन यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीवरून जळगाव शहरातील एका भागात असलेल्या उर्दू शाळेत ४२ वर्षीय महिला शिक्षिका नोकरीला आहेत. २८ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यानच्या काळामध्ये शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळेचे चेअरमन या दोघांनी महिला शिक्षिकेला धक्काबुक्की करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. तसेच त्यांना अश्लिल शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच अनेक वेळा त्यांना शाळेत शिकवत असताना त्यांचा विनयभंग करण्यात आला आहे.

दरम्यान या त्रासाला कंटाळून महिला शिक्षिकेने २६ फेब्रुवारी रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून शाळेचे मुख्याध्यापक आणि चेअरमन या दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील करीत आहेत.

जळगाव शहरात खळबळ
या घटनेमुळे जळगाव शहरातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळेतील इतर शिक्षक आणि विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने