Top News

ब्रेकिंग : जळगावमध्ये ट्रॅक्टर-डंपर धडकेत एक ठार, तीन जण गंभीर जखमी

दूध फेडरेशनजवळ घडली घटना, मृत तरुणाचे नाव अंकुश भिल

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I शहरातील दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ शनिवारी, २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला, तर तीन अन्य गंभीर जखमी झाले आहेत. 

सदर अपघात ट्रॅक्टर आणि डंपर यांच्यातील धडक आणि ओव्हरटेकिंगमुळे घडला. ट्रॅक्टर क्रमांक MH १९ एएन २९०६ मध्ये विटा घेऊन जात असताना, मागून येणाऱ्या डंपरने ट्रॅक्टरला कट मारला आणि त्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन खाली दबले. या अपघातात ट्रॅक्टरवर बसलेला अंकुश आत्माराम भिल (२७ वर्षे, रा. डिकसाई ताम, जळगाव) हा जागीच ठार झाला.

अपघातामध्ये अंकुशच्या सोबत असलेले तीन तरुण – सुनील मधुकर भिल (२२), गणेश भगीरथ भिल (१८) आणि शुभम सुखा भिल (२०) हे गंभीर जखमी झाले आहेत. तिघेही जळगाव शहरातील इदगाव भागातील रहिवासी आहेत. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

घटनेची माहिती मिळाल्यावर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, डंपर ताब्यात घेतला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले. यावेळी, शिवाजीनगर येथील स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त करत, जळगाव शहरातील काही भागांमध्ये अवजड वाहतूक थांबवण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, यापूर्वी देखील प्रशासनाला या संदर्भात तक्रारी आणि निवेदन दिले होते, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई केली गेली नाही.

मयत अंकुश भिल यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा कुटुंब आहे. घरातील कर्ता पुरुष गमावल्यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

यापूर्वी देखील या मार्गावर अवजड वाहतुकीच्या अपघातांच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे स्थानिक नागरिकांची चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी त्यांची मागणी आहे. 

याप्रकरणी अधिक तपास सुरू असून, पोलिस पुढील कार्यवाही करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने