नशिराबाद पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I आंध्र प्रदेशातील एका व्यापाऱ्याला तांब्याची तारांचे भंगार देण्याच्या बहाण्याने जळगाव तालुक्यातील भादली येथील पाच जणांनी बेदम मारहाण केली आणि लुटले. व्यापाऱ्याच्या मोबाइलवरील यूपीआयद्वारे ९० हजार रुपये ट्रान्सफर करून त्याच्याकडून सोन्याची साखळी, अंगठी, घड्याळ काढून घेत एकूण १ लाख ५१ हजार ५०० रुपये लांबवले. ही घटना ९ डिसेंबर रोजी घडली. यावर १० डिसेंबर रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दुर्गा वेंकटेशराव सूर्यनारायण काटाकोटा (४१, वास. वाटलुरू, जि. वेस्ट गोदावरी, आंध्र प्रदेश) हे भंगार खरेदी-विक्रीचे व्यावसायिक आहेत. त्यांना आठवडाभरापूर्वी तांब्याच्या भंगारविषयक दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावर कॉल आले. त्यावरून तांब्याच्या भंगाराचे फोटो मागविण्यात आले आणि त्याची तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्याचा छडा लावला. चार तासांच्या आत पोलिसांनी प्रधूम गुलाब पवार (२२), अजीत भास्कर भोसले (३५), पप्पू उर्फ पप्या गुलाब पवार (२३), सोना उर्फ सोन्या गुलाब पवार (२८), क्रिश उर्फ किरेश रफिक पवार (२४) सर्व रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर यांना अटक केली.
व्यापाऱ्याला लुटून पळून गेलेले पाच जण जंगलात लपून बसले होते. नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आसाराम मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली आणि अटक केली. आरोपींनी व्यापाऱ्याला पाटचारीजवळील पंप हाऊस येथे नेऊन मारहाण केली व त्याच्याकडून सोन्याची साखळी, अंगठी, घड्याळ, तसेच ९० हजार रुपये यूपीआयद्वारे ट्रान्सफर करून घेतले.
पोलिसांनी चोरीस गेलेला मोबाइल, घड्याळ जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई येथील व्यापाऱ्याच्या भावाने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पथकाचे कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा