Top News

मृत महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना 'अनुकंपाधारक' संवर्गातून संधी


रिक्त पदांची माहिती सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, योजनांचा आढावा, ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईची सूचना, अनुकंपाधारकांना ज्येष्ठतेनुसार संधी देण्याचा निर्णय

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्ह्यातील १९ नगरपालिकांमधील रिक्त पदांसाठी मृत कर्मचाऱ्यांच्या 'अनुकंपाधारक' यथासांग नियुक्ती करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. या नियुक्तीसाठी प्रत्येक नगरपालिकेतील रिक्त पदांची माहिती त्वरित सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, मृत पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांची माहिती संकलित करून त्यांच्या नावांची प्रतीक्षा सूचीमध्ये समावेश करण्याचे आदेशही दिले आहेत.

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आणि न.पा. प्रशासन विभागाचे सहआयुक्त जनार्दन पवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी राहुल इथे यांच्या उपस्थितीत सर्व मुख्याधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मुख्याधिकारी अमोल बागूल (एरंडोल), विवेक धांडे (शेंदुर्णी), रवींद्र सोनवणे (नशिराबाद), रामनिवास झंवर (धरणगाव), सोमनाथ जाधव (फैजपूर), कैलास चौधरी (मनपा, जळगाव), गजानन तायडे (बोदवड), अंबादास गर्कळ (मुक्ताईनगर), रवींद्र लांडे (भडगाव), तुषार नेरकर (अमळनेर), सचिन राऊत (वरणगाव), समीर शेख (रावेर), नितीन बागूल (जामनेर), किशोर चव्हाण (पारोळा) व सौरभ जोशी (चाळीसगाव) उपस्थित होते.

बैठकीत घेतलेल्या निर्णयांनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील ८ दिवसांत प्रत्येक पालिकेतील कामांची प्रगती, खर्च, निधी उपलब्धता आणि योजनेसंबंधीची माहिती सादर करण्याची सूचना दिली आहे. तसेच, जे ठेकेदार कामांमध्ये विलंब करत आहेत, त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, आणि ज्या कामांसाठी मुदतवाढ आवश्यक असेल, त्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल.

रिक्त पदांवर कायदेशीर प्रक्रियेनुसार पात्र अनुकंपाधारकांना ज्येष्ठतेनुसार संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे मृत पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना आधार मिळणार आहे, अशी माहिती जनार्दन पवार, सहआयुक्त, नगरपरिषद प्रशासन विभाग यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने