जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I बोदवड शहराच्या विकासासाठी मागील तीन दशके काम करणारे आमदार एकनाथराव खडसे यांच्या कार्याचा वारसा चालवणारी रोहिणी खडसे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नगरपंचायत गटनेते जाफर शेख यांनी आज बोदवड शहरात आयोजित जनआशिर्वाद यात्रेदरम्यान केले.
यावेळी जाफर शेख म्हणाले की, “आमदार एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात बोदवड शहराचा आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला. मात्र, विद्यमान आमदारांनी त्यांना प्राप्त झालेल्या निधीला तांत्रिक कारणे देत स्थगिती आणली आणि सत्तेचा दुरुपयोग करत ते इतरत्र वळवले. यामध्ये तेली समाज मंगल कार्यालय, मुस्लिम शादीखाना, तसेच विविध प्रभागांतील विकासकामांसाठी मिळालेल्या निधीचा समावेश आहे. त्यामुळे, शहराच्या विकासाला अडथळा ठरणाऱ्यांना कायमची स्थगिती देऊन, विकासासाठी रोहिणी खडसे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणणे आवश्यक आहे.”
यावेळी ॲड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “मागील निवडणुकीत शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण विद्यमान लोकप्रतिनिधीला मतदान केले होते. मात्र, त्यांनी गेल्या पाच वर्षात मतदारांचा विश्वासघात केला आणि कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. आता वेळ आली आहे की, मागील चुक सुधारून जनसेवेसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या रोहिणी खडसे यांना निवडून आणावे.”
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा पक्ष आणि महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा