पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी ३० हजार किंमतीचे गावठी पिस्टल जप्त; दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I चाळीसगाव शहरात पोलिसांनी दोन अवैध गावठी पिस्टल जप्त करण्याची मोठी कारवाई केली आहे. पेट्रोलिंग दरम्यान पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांना प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर चाळीसगाव भडगाव रोडवरील वडाळा वडाळी फाट्याजवळील माऊली हॉटेल येथे आरोपी शिवम कैलास जगताप (वय १९, रा. जुना पॉवर हाऊस रोड, भिम नगर, चाळीसगाव) याच्याकडून एक गावठी बनावटीचा पिस्तोल, मॅगझिनसह अंदाजे ३०,०००/- रुपयांचा आणि ४,०००/- रुपयांचे चार जिवंत काडतुसे जप्त केली. एकुण मुद्देमालाची किंमत ३४,०००/- रुपये आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, पोह. सुधाकर अंभोरे यांना मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव भडगाव रोडवरील अंबिका हॉटेल जवळ आरोपी अभिजीत रतन चव्हाण (वय १९, रा. जुना पॉवर हाऊस रोड, भिम नगर, चाळीसगाव) याच्याकडून एक गावठी पिस्तोल, मॅगझिनसह अंदाजे ३०,०००/- रुपयांचा आणि २,०००/- रुपयांचे दोन जिवंत काडतुसे जप्त केली. एकुण मुद्देमालाची किंमत ३२,०००/- रुपये आहे. या प्रकरणी देखील भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अभिजीत चव्हाण याने पिस्तोल समाधान बळीराम निकम (रा. पाचोरा) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली आहे. निकम याला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे.
दोन्ही प्रकरणांचा तपास चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आरोपींना तीन दिवसांची पोलिस कस्टडी रिमांड मिळालेली आहे.
या कारवाईत पोह. सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील, मुरलीधर धनगर, राहुल पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा