Top News

समाजभूषण पुरस्कार सोहळा: डॉक्टर्स व सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान

वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल, सारांश फाऊंडेशनतर्फे समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉक्टर्स व सामाजिक कार्यकर्त्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांचे कौतुक करण्यासाठी सारांश फाऊंडेशनतर्फे समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रविवार, ६ ऑगस्ट २०२४ रोजी शिक्षण शास्त्र महाविद्यालयात संपन्न झाला.

*प्रमुख उपस्थिती आणि कार्यक्रमाचे उदघाटन*
या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा आयएमए असोसिएशनच्या सचिव डॉ. अनिता भोळे, माजी महापौर जयश्री महाजन, जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, माहिती अधिकार कार्यकर्ता अमोल कोल्हे व सारांश फाऊंडेशनच्या अध्यक्षा निलू इंगळे उपस्थित होते. 

या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन, पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. प्रास्ताविक निलू इंगळे यांनी केले, तर सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे, आभार प्रदर्शन सोनाली पवार यांनी केले.

*सन्मानित डॉक्टर्स आणि सामाजिक कार्यकर्ते*
वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. लीना पाटील, डॉ. कोमल सरोदे, डॉ. मोना बोरोले, डॉ. वृषाली पाटील, डॉ. कविता आडिया, डॉ. आनंद दशपुत्रे, डॉ. विकास पाटील, डॉ. उमेश वानखेडे, डॉ. सुषमा चौधरी, आर एल हॉस्पिटलचे डॉ. अनिल शिरसाळे, डॉ. दीपक चौधरी यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

तसेच, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल निवेदिता ताठे, कविता झाल्टे, वैशाली पाटील, माजी नगरसेविका पार्वता भिल, शुभांगी बिऱ्हाडे, कुसुमताई फाउंडेशन, सिद्धिविनायक पार्क महिला मंडळाचा सन्मान करण्यात आला.

*समारोप आणि पुढील उद्दिष्ट*
कार्यक्रमाच्या समारोपात आधार बहुद्देशीय संस्थेच्या प्रकल्प समन्वयक निवेदिता ताठे यांनी उपस्थित सर्वांना बालविवाह मुक्त भारत होण्यासाठी शपथ घ्यायला लावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारांश फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष इंदू मोरे, सचिव चंदा इंगळे, विद्या झनके आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने