Top News

पिंप्राळा परिसरात शाळा, पोलिस चौकीजवळच अवैध धंदे सुरू

पिंप्राळा परिसरातील नागरिकांसह माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची पोलीस अधीक्षक कार्यावर धाव

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I पिंप्राळा हुडको परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिक पोलिस अधीक्षक कार्यालयात पोहोचले. यावेळी अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात त्यांनी निवेदन दिले.

यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंप्राळा परिसरातील हुडको आणि ख्वॉजानगरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत. यामुळे तरुणांसह परिसरातील लहान मुले व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे.

याठिकाणी असलेल्या पोलिस चौकीसह महापालिकेच्या उर्दू हायस्कूल व मौलाना अब्दुल कलाम आझाद प्राथमिक शाळेच्या परिसरातील रस्त्यावर सर्रासपणे गावठी हातभट्टी दारूची विक्री केली जाते. त्याच ठिकाणी सट्टा, पत्त्यांचे डावदेखील सुरू असतात. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याच परिसरातून जाण्यासाठी मार्ग असल्यामुळे त्यांना या सर्वांचा त्रास करीत शाळेत जावे लागते. भर रस्त्यात असलेल्या दारूच्या अड्ड्यांवर दारू पिऊन मद्यपी मोठमोठ्याने शिवीगाळ करीत धिंगाणा घालत असल्याने त्याचा त्रास परिसरात नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी यावेळी मांडल्या. याप्रसंगी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, मुफ्ती हारुन, माजी नगरसेविका हसिना शरीफ शेख, सुरेश सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी, आसीफ शेख, एमआयएमचे अक्रम देशमुख, विनोद निकम यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने