Top News

जळगाव जिल्ह्यात पोलीस दलात मोठा फेरबदल — संदीप गावित नवे अपर पोलीस अधीक्षक


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राज्य पोलीस दलात व्यापक पातळीवर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, जळगावचे विद्यमान अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संदीप रघुनाथ गावित यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते लवकरच जळगाव जिल्ह्याचे नवे अपर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. गृह विभागाने शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भातील आदेश जारी केले.

नवे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांचे जळगाव जिल्ह्याशी आधीपासूनच निकटचे नाते आहे. त्यांनी यापूर्वी जळगाव शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून कार्यरत असताना उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांच्या स्थानिक अनुभवामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अशोक नखाते यांनी आपल्या कार्यकाळात अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास यशस्वीरीत्या पूर्ण केला तसेच बंदोबस्ताच्या जबाबदाऱ्या अत्यंत काटेकोरपणे पार पाडल्या. त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला होता.

संदीप गावित यांच्या नियुक्तीनंतर आता पोलीस दलाच्या कार्यपद्धतीत कोणते बदल घडतील आणि जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी ते कोणत्या नव्या उपक्रमांना सुरुवात करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने