जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील अतिक्रमण कारवाईत होत असलेल्या कथित भेदभावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देत प्रशासनाला जाब विचारला आहे. खोटे नगर ते कालिका माता मंदिर या प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, विशेषतः परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून रस्त्यावर विविध साहित्य विक्री सुरू असतानाही अतिक्रमण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
याउलट, स्थानिक मराठी तरुण उपजीविकेसाठी छोटे-मोठे व्यवसाय करत असताना त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई केली जात असल्याने शहरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. “अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत दुहेरी निकष लावले जात आहेत का?” असा सवाल उपस्थित करत मनसेने प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर मनसेने हॉकर्स धोरणाबाबत सविस्तर भूमिका मांडत, शहरात नियोजित व कायदेशीर हॉकर्स झोन तातडीने निश्चित करण्याची मागणी केली आहे. शहरातील लघु व्यावसायिकांना योग्य जागा, मूलभूत सुविधा आणि कायदेशीर संरक्षण मिळावे, यासाठी हॉकर्स नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः स्थानिक मराठी तरुणांसाठी स्वतंत्र व सुसज्ज हॉकर्स झोन आखण्यात यावा, जेणेकरून त्यांना सन्मानाने व्यवसाय करता येईल, अशी ठाम मागणी करण्यात आली.
मनसेने स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की, “जोपर्यंत अतिक्रमण कारवाईत पारदर्शकता येत नाही आणि सर्वांवर समान निकष लावले जात नाहीत, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही.” तसेच, स्थानिक मराठी हॉकर्सवर अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि त्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे पाठीशी उभी राहील, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
खोटे नगर ते कालिका माता मंदिर परिसरातील सर्व अतिक्रमणांचे समान निकषांवर पुनरावलोकन करण्यात यावे, तसेच परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून होणारे बेकायदेशीर अतिक्रमण तातडीने हटवावे, अशी मागणी करत मनसेने प्रशासनाला कठोर शब्दांत इशारा दिला आहे.
दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि गरज पडल्यास अतिक्रमण हटविण्याची कारवाई जनतेच्या सहकार्याने स्वतः हाती घेण्यात येईल, असा ,स्पष्ट इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उप महानगराध्यक्ष ललित शर्मा, चेतन पवार, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, बादशहा शहा, अल्ताफ शहा,महिला सेनेच्या अनिता कापुरे,भूषण ठाकूर, हेमंत मराठी, यश पाटील, गोपाल कोळी, शुभम काळे, चिराग लोखंडे, चुनेस अत्तरदे, सोनू निमाडकर, ऋषी पाटील, साई पाटील, गौरव पाटील, दर्शन पाटील, पंकज बोरसे, रोहित कोळी, आदित्य गायकवाड, राहुल सोनवणे, पियुष जहा, धीरज काळे, श्याम मराठे, माया मराठे, अन्याय झालेले मराठी हॉकर्स उपस्थित होते,
टिप्पणी पोस्ट करा