जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार आज करिश्मा नायर यांनी औपचारिकरित्या स्वीकारला. सकाळी सुमारे साडेदहा वाजता जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील आपल्या दालनात त्यांनी कार्यभार हाती घेताच कामकाजाला सुरुवात केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या हस्ते त्यांना पदभार सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची मुंबई येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अभियान संचालक पदावर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी करिश्मा नायर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी नाशिक महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.
पदभार स्वीकारल्यानंतर करिश्मा नायर यांनी तात्काळ ‘ॲक्शन मोड’मध्ये कामकाज हाती घेतले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या नवीन व जुन्या अशा दोन्ही प्रशासकीय इमारतींमधील सर्व विभागांना भेटी देत प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेतला. प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांनी त्यांच्या टेबलवर जाऊन माहिती जाणून घेतली तसेच कामकाजाबाबत आवश्यक मार्गदर्शनही केले.
या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
करिश्मा नायर यांच्या या सक्रिय आणि सकारात्मक कार्यपद्धतीमुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा