जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I सावखेडा शिवारातील कोल्हे परिसरातील संविधान नगरात उभारलेला बुद्धविहार हा केवळ धार्मिक स्थळ नसून समाजाच्या श्रद्धा, स्वाभिमान आणि एकात्मतेचे प्रतीक मानला जातो. मात्र, सध्या या पवित्र स्थळाच्या आवारात गटारीचे सांडपाणी साचत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
परिसरातील गटार तुंबल्यामुळे सांडपाणी थेट बुद्धविहारात शिरत आहे. विहारासमोरील चेंबर ब्लॉक झाल्याने घाण पाणी ओसंडून बाहेर येत असून, त्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. या प्रकारामुळे पवित्र स्थळाची पवित्रता धोक्यात आली असून, नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त याच ठिकाणाहून उत्सवाची सुरुवात होते. हजारो अनुयायी येथे एकत्र येतात. अशा परिस्थितीत विहार परिसरात साचलेले सांडपाणी आणि अस्वच्छता हे चित्र अत्यंत लज्जास्पद ठरत आहे.
या प्रकारामुळे प्रशासनाच्या उदासीनतेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पवित्र स्थळांची स्वच्छता आणि सन्मान राखणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी असताना, येथे मात्र त्या कर्तव्याची उपेक्षा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
नागरिकांनी प्रशासनाला तातडीने दखल घेऊन गटार दुरुस्ती करून ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी केली आहे. अन्यथा, वाढता रोष आणि भावना दुखावल्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा